Powered By Blogger

Wednesday, December 8, 2010

मज्जा

असे म्हंटले की हसू येऊ शकणारे काही निर्व्याज जीव अजूनही भूतलावर तरंगताना आढळतात.

आता हसण्याचे विविध फायदे पाहू.

१. हसण्यामुळे हसता येते हे सिद्ध होते.

२. हसण्यामुळे पोट गदागदा हालल्यामुळे पचनसंस्था ऍक्टिव्हेट होते.

३. हासणे हे 'हसावेसे वाटणे' या भावनेचे व्यक्तीकरण आहे. 'हसावेसे वाटणे' हे माणसाला 'मजा' वाटल्यावर होत असल्यामुळे 'हासणे' हे काही ना काहीतरी मजा झाल्याचे द्योतक असू शकते.

४. हासण्यामुळे दात दिसत असल्यामुळे दातांची निगा राखावी अशी इच्छा नैसर्गीकपणे होण्याची शक्यता असल्यामुळे 'ती निगा राखली जाणे', 'पेस्टचे कारखाने चालणे', 'ब्रशचे कारखाने चालणे', 'त्यामुळे अर्थकारणाला चालना मिळणे' वगैरे गोष्टी आपोआप होतात.

५. हासणे ही एक नैसर्गीक क्रिया असल्यामुळे निसर्गमित्र असल्याची भावना जागृत होणे शक्य होते.

६. हासणे हे मानवाच्या माहितीप्रमाणे फक्त मानव करू शकत असल्यामुळे 'आपण मानव आहोत' याची खात्री पटण्यास मदत होते.

७. हासताना आपल्या नियंत्रणात नसणारे आवाज आल्यामुळे 'आपण असेही आवाज ( तोंडातून ) काढू शकतो' यावर विश्वास बसून माणसाला आपल्या काही सुप्त क्षमतांची जाणीव होते.

No comments:

Post a Comment