दैनिक सकाळ - बुधवार दिनांक ५ सप्टेंबर २००७
उडत्या तबकड्या - अंतराळ युगातील अंधश्रद्धा
(जयंत नारळीकर)
अधूनमधून वृत्तपत्रांत बातमी येते, की अमुक अमुक ठिकाणी तमुक व्यक्तीला आकाशात फिरणारी प्रकाशवान वस्तू दिसली, जिची नीट ओळख पटू शकली नाही. "ती वस्तू काही काळ दिसली, मग अदृश्य झाली' अशा बातमीपासून "त्या वस्तूतून काही परकीय जीव आले' अशांसारखी विधाने पाहणाऱ्याने केलेली असतात.
सामान्यपणे आकाशात "उडणारी' अपरिचित वस्तू किंवा "अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स' ("यूएफओ') म्हणजे परकीय जीवसृष्टीकडून आलेले यान, हा समज एक अंधश्रद्धेचाच प्रकार समजावा.
याला सुरवात झाली २४ जून १९४७ रोजी! केनेथ आर्नोल्ड हा एक व्यापारी स्वतःचे विमान चालवत जात असताना वॉशिंग्टन राज्यात माऊंट शेनियरजवळ त्याला बश्यांच्या आकाराची याने माळेच्या रूपात उत्तरेकडून दक्षिणेकडे उडत जाताना दिसली. वृत्तपत्रांना त्याने ही माहिती दिल्यावर तेथे तिला पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. उडत्या तबकड्या (फ्लाइंग सॉसर्स) ही संज्ञा तेथूनच जन्माला आली.
आर्नोल्डच्या वक्तव्यानंतर "आम्हाला अमुकतमुक विचित्र गोष्ट उडताना दिसली', असे सांगणारे इतर अनेक लोक वेळोवेळी पुढे आले. पुढे पुढे अशी विधाने केली जाऊ लागली, "परकीय जीवांची याने पृथ्वीवर येत असतात... अमेरिकी वायुसेनेला त्यांची माहिती आहे; पण ते ती गुप्त ठेवतात... वायुसेनेच्या आणि सीआयएच्या लेखागारात ही गुप्त माहिती आहे, इत्यादी इत्यादी.' अखेर या वक्तव्यांना आवर घालण्यासाठी वायुसेनेने चौकशी समित्या वेळोवेळी स्थापन केल्या. त्यांना प्रकल्प साइन (१९४८), प्रकल्प ग्रज (१९४९) आणि प्रकल्प ब्लू बुक (१९५२-६९) अशी नावे दिली. त्या सर्वांचे निष्कर्ष होते, की उडत्या तबकड्यांचा देशाला कसलाही धोका नाही. त्या दृष्टिभ्रम किंवा चुकीचे निष्कर्ष किंवा जाणूनबुजून दिलेल्या खोट्या वृत्तान्तावर अवलंबून असतात, असे दिसून आले. कोणी "यू.एफ.ओ.' पाहिल्याचा दावा केला, म्हणजे त्याचा अर्थ सकृद्दर्शनी त्याला ओळखता आली नाही अशी वस्तू त्याने आकाशात पाहिली, असा होतो. हा दावा खरा मानला, तर ती वस्तू काय असू शकेल? काही पर्याय असे आहेत -
शुक्र ग्रह कधी कधी सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी क्षितिजाजवळ असतो. अशा वेळी तो झाडा/घराआडून डोकावताना दिसतो. मोटारसायकलवरून जाणारा माणूस तिकडे पाहत असेल, तर त्याला असे जाणवेल, की तो आपला पाठलाग करतोय! अशा वेळी "उडती तबकडी' आपल्याशी शिवाशीव करती होती, असे वाहनचालकाला वाटते. केनेथ आर्नोल्डला दिसलेल्या "तबकड्या' दृष्टिभ्रमाचा प्रकार असेल, असा वायुसेनेच्या तज्ज्ञांचा अंदाज होता. वाळवंटात तापमान उंचीप्रमाणे कमी होत जाते व त्याचा परिणाम मृगजळ दिसण्यात होतो. आर्नोल्डचे विमान साधारण ९५०० फुटांवरून जात होते. तेथे वातावरण स्वच्छ, निरभ्र होते. अशा स्थितीत तापमानाचा क्रम उलटल्यामुळे (वर वाढत गेल्याने) मृगजळ दिसते; पण आकाशात! वैमानिकांना याचा अनुभव येतो. हे थंड वातावरणात आकाशात दिसणारे मृगजळ.
अंतराळ युगाला सुरवात झाल्यापासून मानवनिर्मित उपग्रह मोठ्या संख्येने पृथ्वीभोवती फिरत आहेत. सूर्योदय व सूर्यास्त होत असताना ते प्रामुख्याने दिसू शकतात. ते "यूएफओ' म्हणून अनेकांनी पाहिलेले असतात. काही प्रकरणांत "यूएफओ'चा दावा करणारा, घटनेचा साक्षीदार हा मानसिक वैगुण्याने प्रभावित असा सापडला आहे. आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून त्याने रचलेली ही गोष्ट असते. कधी कधी ती इतकी स्वाभाविक असते, की सांगणाऱ्याला आपण लोणकढी ठेवून दिलीय, याची जाणीवही नसते आणि काही बाबींत तर आगाऊ योजना करून फसवण्याचे उपक्रम केले गेले. यामागे मानसिक कारण नसून, ही हकिगत रचण्यामागे धनलाभ व्हावा, हे उद्दिष्ट होते.
अशी एक घटना न्यू मेक्सिको राज्यात सोकोरोजवळ घडली. झामोरा नावाचा एक ट्रॅफिक पोलिसमन एका वेगमर्यादा ओलांडून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करत होता. अशा वेळी त्याला डोक्यावरून एक आकाशयान जाताना दिसले. आपला पाठलाग सोडून झामोरा त्या यानामागे लागला. जवळच एका टेकडीवर ते यान उतरले आणि स्थिरावले. त्यातून पांढरे कपडे घातलेल्या दोन व्यक्ती उतरल्या. झामोरा आपली गाडी थांबवून बाहेर आला आणि यानाच्या दिशेने चालू लागला. यानातल्या लोकांना काही मदत हवी आहे का ते विचारायला; पण त्या व्यक्ती यानात शिरल्या व यानातून धूर, आग आणि आवाज येऊ लागल्यावर घाबरून झामोरा आपल्या कारकडे पळाला. वाटेत त्याचा चष्मा खाली पडला. तो उचलून कारपर्यंत गेला तेव्हा ते यान निघण्याच्या तयारी होते. ते लवकरच आकाशाकडे झेपावले आणि नाहीसे झाले. पुढे यान जेथे उतरलेले झामोराने पाहिले तेथे यानाची "पदचिन्हे' दिसली.
झामोराची जबानी पुष्कळ वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली. "यूएफओ' दिसले ती जागा पाहायला पुष्कळ पर्यटक आले, तेव्हा तिकडे जायला म्युनिसिपालिटीने पक्का रस्ता बांधला. शास्त्रज्ञांनीदेखील त्या जागांना भेटी दिल्या; पण झामोराने नक्की काय पाहिले यावर एकमत होऊ शकले नाही. पुढे फिलिप क्लास या पत्रकाराने याचा छडा लावला. झामोराच्या जबानीत पुष्कळ विसंगती दिसल्या. उदाहरणार्थ - टेकडीपासून जवळच एक शेतकरी राहत होता, त्याला यातले काहीच दिसले नाही. झामोराच्या वर्णनानुसार मोठा आवाज झाला तो त्याला ऐकू यायला पाहिजे होता, तसेच आगही दिसायला हवी होती; पण त्याने हे काहीच अनुभवले नव्हते. क्लासने आणखी एक पत्ता लावला. जेथे यान उतरल्याचा दावा झामोराने केला ती जागा, ती टेकडीच गावातल्या पौरांची होती. तेव्हा त्यांच्या जागेकडे पक्का रस्ता बांधायचे काम "यूएफओ'च्या निमित्ताने म्युनिसिपालिटीच्या खर्चाने झाले. अशा तऱ्हेने "यूएफओ' आले, गेले; पण फायदा मेयरसाहेबांना झाला.
क्लासने आपल्या पुस्तकात (शीर्षक ः यूएफओज एक्सप्लेन्ड ः "यूएफओ'ची कारणमीमांसा) अशा अनेक अनाकलनीय वाटणाऱ्या घटनांमागचे रहस्य उकलून दाखवले आहे. असे म्हणायला हरकत नाही, की आजवर अनेक यूएफओच्या घटनांची छाननी झाली; पण अद्याप परकीय जीव इथे येऊन गेले हे सिद्ध करणारी एकही घटना समोर आली नाही.
एक गोष्ट या संदर्भात नमूद करण्याजोगी आहे. आपल्याकडे वाहनांची दोन टोकाची उदाहरणे म्हणजे बैलगाडी आणि जेट विमान. यांत किती साम्य आहे? काहीच नाही. कारण जसे वाहनांचे तंत्रज्ञान बदलत जाते, त्यांचा आकारही बदलतो. याच नियमाप्रमाणे अंतराळात दूरदूरचे प्रवास करायचे तंत्रज्ञान आपल्या सध्याच्या चंद्रा-मंगळाकडे जाणाऱ्या यानांच्या तंत्रज्ञानापेक्षा पुष्कळ वेगळे असायला हवे; पण आजवर वेगवेगळी "यूएफओ' प्रेक्षकांनी "पाहिलेली' याने त्यांच्याच वर्णनानुसार आपल्या विमानांपेक्षा किंवा अंतराळ यानांपेक्षा फार वेगळी नाहीत. हे कसे संभवते? जर यूएफओ ही अनेक प्रकाशवर्षे अंतरांवरून अतिवेगाने इकडे आली, तर त्यांचे तंत्रज्ञान आणि आपले आजचे अंतराळ तंत्रज्ञान यात जमीन-अस्मानाचा निदान जेट विमान - बैलगाडीतला फरक असायला हवा! तेव्हा अशी शंका घ्यायला वाव आहे, की ज्या लोकांनी यूएफओ पाहिल्याचे दावे केलेत त्यांची कल्पनाशक्ती फार मोठी झेप घेऊ शकली नाही.
आणि "यूएफओ'ची छायाचित्रे पाहिल्याची उदाहरणे आहेत. छायाचित्रे खोटे बोलत नाहीत त्याचे काय? यावर क्लासच्या पुस्तकात एक खरा किस्सा आहे, तो पाहा. दोन शाळकरी मुलांनी यूएफओची छायाचित्रे स्थानिक वृत्तपत्रात छापली. ते यान दुरून जवळ येताना आणि मग लांब जाताना त्यांनी छायाचित्रित केले. छायाचित्रात गोल यान खिडक्यांसकट होते. काही काळ शास्त्रज्ञदेखील चक्रावले; पण अखेरीस छायाचित्रांच्या निगेटिव्ह्जवरील क्रमांक वेगळाच क्रम दाखवत होते. मग विशेष उपकरणे वापरून छायाचित्रांची तपासणी केली तेव्हा रहस्य उलगडले. कार्डबोर्डचे मॉडेल बारीक निळ्या सुताने झाडाच्या फांदीला टांगून निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर फोटो घेतले होते. त्यांत सूत दिसत नव्हते.
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)
"यूएफओ' आणि "परकीय जीव'

No comments:
Post a Comment