Powered By Blogger

Tuesday, December 7, 2010

सुनामी लाटांमध्ये सापडली उडती तबकडी?
    
सुनामी लाटांनी घडवून आणलेल्या महाप्रलयातून सावरण्याचा प्रयत्न या लाटांचा तडाखा बसलेले देश करीत असतानाच या सुनामी आपत्तीतून काही नवनवीन माहिती हाती येत आहे. जगात अधूनमधून उडत्या तबकड्यांची (अनआयडेंटीफाय फ्लाइंग ऑब्जेक्ट) चर्चा चालू असते. पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीविषयी नेहमीच कुतूहल असते. त्यामुळे वर परग्रहांवरून पृथ्वी येऊन गेलेल्या कथित उडत्या तबकड्यांची चर्चा तिखटमीठ लावून होत असते. सुनामी-प्रलयानंतर अशीच एक सनसनाटी बातमी ‘वीकली वर्ल्ड न्यूज‘च्या वेबसाइटवर दिसून आली. सुनामी लाटांच्या तडाख्यानंतर मदतकार्यासाठी गेलेल्या थायलंडच्या मदतपथकास हाँग बेटाच्या किनारपट्टीवर वाळूत रुतून बसलेली एक प्रचंड उडती तबकडी आढळली. ही ९० फूट व्यासाची तबकडी वाळूमध्ये अर्धी रुतून बसली होती. थायलंडच्या पोलिसांनी आणि अन्य अधिकार्‍यांनी त्या गूढ वस्तूविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यातून त्यांना आणखी आश्चर्यकारक माहिती मिळाली. काय होती ती माहिती?
थायलंडचे अधिकारी त्या उडत्या तबकडीत गेले असता त्यांना परग्रहावरील दोघांचे पार्थिव त्यात आढळून आले. उडत्या तबकडीच्या कॉकपिटमध्ये या दोघांची प्रेते त्यांना आढळली. पण त्याही पुढे आणखी आश्चर्य वाटण्यासारखे दृश्य त्या लोकांना दिसले. तबकडीतील एका जलप्रतिबंधक खोलीत एका थायी महिलेस जखडून ठेवले होते. २७ वर्षे वयाच्या त्या महिलेचे नाव वेन्डी कार्प्सडेल असे असून, तिचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. परग्रहावरील मंडळींनी पृथ्वीवरील मानवावर संशोधन करण्यासाठी वेन्डीला सदर खोलीत जखडून ठेवल्याचा तर्क व्यक्त करण्यात आला आहे. उडत्या तबकडीतील वेन्डीला नंतर वैद्यकीय उपचारासाठी तेथून बँकॉकला हलविण्यात आल्याची माहितीही संबंधित वृत्तान्त देण्यात आली आहे. ती उडती तबकडी थायलंड परिसरात कशी आली, त्यातील लोकांनी वेल्डीचे अपहरण कधी केले, सुनामी लाटांच्या तडाख्यात सदर तबकडी कशी सापडली, परग्रहावरून येण्याइतके प्रगत तंत्रज्ञान ज्यांच्याजवळ आहे त्यांचे यान सुनामी लाटांच्या तडाख्यात कसे काय सापडले, अशा तुम्हा-आम्हाला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे मात्र संबंधितांकडून उपलब्ध होऊ शकली नाहीत. थायलंडचे सरकार या घटनेबाबत अत्यंत गुप्तता पाळत असून, दुजोरा देण्याबाबतही त्या सरकारची ‘अळीमिळी गुपचिळी‘ आहे. सदर तबकडी रडार यंत्रणेला चुकविण्यासाठी अत्यंत खालून उडत असावी आणि त्यामुळे ती सुनामी तडाख्यात सापडली असावी, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे तर सदर यान पाण्याखालीही प्रवास करण्याची क्षमता असल्याचे असावे आणि सुनामी लाटांमुळे त्या यानाची अशी अवस्था झाली असावी, असे काहींचे म्हणणे. थायी किनार्‍यावर आढळलेल्या त्या यानात प्रवेश करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. लेसर किरणांचा वापर करून त्या तबकडीचे झाकण उघडण्यात आले. आतमध्ये प्रवेश केल्यावर प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे त्या यानात लोक आढळले. थायलंडच्या कोह लाओ ला डिंग समुद्रकिनार्‍यावर ६ जानेवारी २००५ रोजी आढळलेले ९० फूट व्यासाचे यान म्हणजे खरोखरच परग्रहावरून आलेली एखादी उडती तबकडी होती की अन्य एखादे यान होते की हा सर्वच प्रकार ‘फोकनाड‘ आहे, याचे गूढ कधी उलगडेल हे मात्र सांगता येणार नाही. पण सुनामी-प्रलयाच्या पार्श्वभूमीवर या उडत्या तबकडीची चर्चा ‘नेटकरां‘मध्ये चालू आहे, हे यानिमित्ताने जगासमोर आले आहे.

No comments:

Post a Comment