तुला वाटले 'दूर किती मी झालो ', पण मी तिथेच आहे
तुला वाटले विसरुन जाईन जे जे सारे घडले आहे
हसता हसता ठसका लागुन जर पाणी डोळ्यांतुन आले
समज इथे मी वाट पाहुनी थकलेली पण उभीच आहे.
जाता जाता कानापाशी कुजबुजल्याचा भास कधी जर
झाला, तर तू समज इथे मी तडफ़डते बडबडते आहे
तुला वाटले महिना दो महिन्यांनी मीही विसरुनच जाईन
खुळ्या , भूक तू माझी, माझी तहानही तुजपाशी आहे
तुला भरंवसा काळाच्या खपलीने सारे बुजून जाईल
मला खातरी परतुन सारे येईल जे जे माझे आहे
दर्भ बनुन बोहल्यावर तूझ्या जळेन मीही त्या होमावर
गळेल पाणी तेव्हा म्हणशिल धूर किती हा छळतो आहे
प्रेमाचे ते चार दिवस रे माझे सारे जगणे होते
स्मरणाचा तो अंतिम क्षण मरणाची माझ्या पहाट आहे
तुला वाटले 'दूर किती मी झालो ', पण मी तिथेच आहे
विसरुन जाणे शक्य नसे रे जे जे सारे घडले आहे
गीत : स्वरांगी देव

No comments:
Post a Comment